Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था आहे. जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रुपात रुग्णांचा जीव वाचवत आहे, असे सांगत या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आहेत.

२००५ च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टो, डेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झाली, नंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला कस्तुरबा आणि पुण्याची एनआयव्ही अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री असलम शेख यांनी यावेळी गौरव केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading