प्रभात बँडचे श्रीपाद सोलापूरकर यांना यंदाचा लोकशिक्षक पुरस्कार प्रदान

पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि ठाकूर परिवाराच्यावतीने ज्येष्ठ शाहीर व शिक्षक कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ यंदाचा लोकशिक्षक पुरस्कार प्रभात बँडचे श्रीपाद सोलापूरकर यांना प्रदान करण्यात आला. अप्पा बळवंत चौकातील सोलापूरकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे नवनिर्वाचित सचिव अण्णा थोरात, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष पराग ठाकूर, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे, शिरीष मोहिते, अमर लांडे, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, विश्वस्त सुरेश तरलगट्टी आदी उपस्थित होते. प्रभात बँडच्या कार्यालयासमोर रांगोळी, दाराला तोरण लावून सनई-चौघडयांच्या गजरात सोलापूरकर यांना सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, मिठाई, चाफ्याची फुले असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार वितरण सोहळाचे १३ वे वर्ष आहे.

अण्णा थोरात म्हणाले, अखिल मंडई मंडळात गणरायासमोर सोलापूरकर कुटुंबाने अनेक पिढयांपासून वादन केले आहे. संगीताच्या माध्यमातून गणेशाची केलेली ही सेवा आहे. ते नू.म.वि. शाळेचे विद्यार्थी असून त्यांना लोकशिक्षक पुरस्काराने गौरविताना आम्हाला आनंद होत आहे.

श्रीपाद सोलापूरकर म्हणाले, तरुणपणी कंपनीमध्ये नोकरीला न जाता, त्यावेळेत मी हनुमान टेकडीवर जाऊन वाद्य वादनाचा सराव करीत होतो. पुण्यामध्ये कॅम्प परिसरात, मुंबई अशा विविध ठिकाणी वादनाचे धडे घेतले. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना वाद्यप्रशिक्षण दिले असून त्यांच्याकडून कोणताही मोबदला मी घेतला नाही. पोलीस भरतीसाठी जाणारे अनेक विद्यार्थी आमच्याकडे वाद्यप्रशिक्षण घेतात. मला मिळालेला पुरस्कार हा पूर्वजांची पुण्याई असून यापुढेही गणेशाची सेवा संगीताच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, कला व संस्कृती टिकवित प्रबोधनाचे कार्य करीत नवी पिढी घडविण्याचे काम करणा-यांना लोकशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. बँडचा वारसा पुढे नेत सोलापूरकरांनी घराण्याची परंपरा जपली आहे. पुढच्या पिढीमध्ये देखील ही कला प्रवाहित केली आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देत आहोत.

पराग ठाकूर म्हणाले, पुरस्कारार्थींच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्याची परंपरा आम्ही या कार्यक्रमाद्वारे सुरु केली. पुरस्कारार्थीच्या घरासमोर रांगोळी काढत दाराला तोरण लावून सनई-चौघडयांच्या निनादात हा सन्मान केला जातो. आजूबाजूच्या नागरिकांना कळावे की, आपल्याशेजारी असा लोकशिक्षक रहात आहे, ही त्यामागची भावना आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: