fbpx

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

मुंबई : देशातले वैद्यकीय तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्य यांनी राज्यात कोविडची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तविली असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने सतर्क राहून आवश्यक असणारी पूर्वतयारी करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज संबंधित अधिष्ठाता यांना दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयातील सर्व अधिष्ठांताशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव संजय सुरवसे यांच्यासह सर्व शासकीय वैद्‌यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, कोविड विषाणूची तिसरी लाट येईल अशी शंका वर्तविण्यात येत असल्याने आपल्या सर्वांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयाच्या अधिष्ठातांनी पुढील काही दिवस अधिक सजग राहून कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी.

येत्या रविवारी होणाऱ्या वेबिनारमध्ये अधिकाधिक डॉक्टरांनी सहभागी व्हावे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या रविवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांसोबत आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. या वेबिनारमध्ये विविध विषयातील तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्यही सहभागी होणार असून सर्व अधिष्ठाता यांच्यासह त्या–त्या महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे. याशिवाय जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनाही सहभागी करुन घ्यावे.

शासनामार्फत लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोविडमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आता मात्र वर्ग 1 ते  वर्ग 4 मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने लवकरच नवीन भरती होणार आहे. वर्ग 1 आणि वर्ग 2 ची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तर वर्ग 3 ची भरती वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत होणार आहे. तर वर्ग 4 मधील पदे अधिष्ठाता यांना करार पध्दतीवर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: