Saturday, August 1, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट : सर्वपक्षीय शिष्टमंडळाची उपस्थिती

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.

गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, हि समाजाची वास्तविकता संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींपुढे मांडून या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती केली.

१०५ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार करून मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी हि राज्य शासनाची आहे. यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंद्रा साहनी खटल्यात सांगितले प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदुरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकार मार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता संभाजीराजे यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे व्यक्त केली. तसे शक्य होणार नसेल तर साधा व सोपा मार्ग म्हणजे EWS प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे संभाजीराजे म्हणाले.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजीराजे यांच्यासह उपस्थित सर्वपक्षीय प्रतिनिधींचे म्हणणे सविस्तरपणे व गांभीर्यपूर्वक ऐकून घेतले व पुढील कार्यवाही करण्यासाठी या विषयावर अभ्यास करणार असल्याचे सांगितले, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राष्ट्रपतींच्या या भेटीकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading