fbpx

प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि  कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन संचलित प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  वक्तृत्व, पोवाडा, भजन, भारूड या चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.  तब्बल ७५ हजारांची पारितोषिके आणि विजेत्या स्पर्धकांना चषक देण्यात येणार आहे. अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी दिली.

पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, एनएसएसचे प्रमुख डॉ.देसाई यांनी देखील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. स्पर्धेकरीता प्रवेश विनामूल्य असून एका स्पर्धकाला सर्व प्रकारांमध्ये सहभागी होता येणार आहे.  स्पर्धकांना १० सप्टेंबर २०२१ पर्यंत व्हिडीओ पाठवता येणार आहे. स्पर्धकांनी  व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९४२२०२९२४७ यावर व्हिडिओ पाठवायचा आहे.  स्पर्धेचे प्रमुख परीक्षक शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे असणार आहेत.

संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, वत्कृत्व स्पर्धेचे विषय आरक्षण- सद्य स्थिती व अपेक्षा, बाजारातील शेतकरी व शेतकर्यांचा बाजार, न्यायव्यवस्था – काल, आज आणि उद्या, कोविड १९ – कोलमडलेली अर्थव्यवस्था, सामाजिक माध्यमांचा अतिवापर व गोपनीयता हे असणार आहेत. तर, पोवाडा, भजन, भारूड आपल्याला हव्या त्या विषयांवर सादर करता येणार आहे. प्रत्येक विषयातील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये ८ हजार व चषक, द्वितीय क्रमांकास रुपये ४ हजार व चषक तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार व चषक तसेच ३ उत्तेजनार्थ स्पर्धकास प्रत्येकी १ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.तरी महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: