विश्व हिंदू परिषदेतर्फे श्री जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव काठीचे स्वागत व पूजन

पुणे : श्री जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव सोहळ्यांतर्गत काठीचे म्हणजेच निशाणाचे स्वागत व पूजन विश्व हिंदू परिषद पूर्व पुणे विभागातर्फे शुक्रवार पेठेतील भारत भवन येथील परिषदेच्या प्रांत कार्यालयाच्या आवारात झाले. सुवासिनींनी औक्षण करीत निशाणाचे व हरकानगर आणि गुरुवार पेठ आखाडयातील सहभागींचे स्वागत केले. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिका-यांनी निशाणाचे पूजन करीत आरती देखील केली. 
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री विनायक देशपांडे, प्रांत उपाध्यक्ष बापुजी नाटेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री सतिश गोरडे, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, भाग मंत्री गणेश वनारसे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, हरकानगर निशाण आखाडयाचे गोपाळ भगत, गुरुवार पेठ निशाण आखाडयाचे भगवान भगत आदी उपस्थित होते. 

विनायक देशपांडे म्हणाले, गोगादेव महाराजांनी धर्मरक्षणाचे कार्य केले, हा इतिहास आपण वाचला पाहिजे आणि त्याचा प्रचार-प्रसार व्हायला हवा. रक्षण करणारा केवळ पुरुष नाही, तर महापुरुष असतो. साधू-संतांनी देखील जीवनभर प्रचार केला, असेच गोगादेव महाराज आहेत. 
ते पुढे म्हणाले, गोगादेव महाराजांनी स्वत: आणि कुटुंबासह हे कार्य केले. त्यामुळे श्री जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा व श्री गोगादेव महाराज हा केवळ वाल्मिकी समाजाचा विषय नाही. तर हिंदू समाजासाठी आदर्शवत विषय आहे. गोगादेव महाराज संपूर्ण भारताचे आणि हिंदू धर्माचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
हरकानगर निशाण आखाडयाचे गोपाळ भगत आणि गुरुवार पेठ निशाण आखाडयाचे भगवान भगत यांनी विश्व हिंदू परिषदेने केलेले स्वागत व सत्काराबद्दल आभार मानले. दोन्ही आखाडयांतील सेवकांनी भजन देखील सादर केले. तसेच, कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: