भारत व बांग्लादेश मधील ग्योथे इंस्टिट्युट्सच्या वतीने पुरुषत्व विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन      

पुणे : भारत व बांग्लादेश या दोन देशांमधील विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व बौद्धिक विषयांबरोबरच लैंगिक स्पेक्ट्रमच्या पुढे जात पुरुषत्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन व सद्य परिस्थितीवर चर्चा करण्याच्या हेतूने दोन्ही देशांमधील ग्योथे इंस्टिट्युट्सच्या वतीने पुरुषत्व विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एम थ्री : मॅन, मेल, मॅस्क्युलिन’ असे या ऑनलाईन परिषदेचे शीर्षक असून येत्या  ३ व ४ सप्टेंबर, २०२१ रोजी सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेमध्ये सर्वजण विनामूल्य सहभागी होऊ शकतात मात्र आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संस्थेच्या दक्षिण आशिया विभागासाठी हा एक प्रोजेक्ट असून या परिषदेअंतर्गत समाजातील सध्याची पुरुषत्वाची संकल्पना, विविध माध्यमांमधील पुरुषत्वाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, युवा पिढी याकडे कसे पाहते असे संबंधित विषय यामध्ये चर्चिले जातील. शिवाय परिषदेच्या माध्यमातून दक्षिण आशिया व युरोपमधील तज्ज्ञ मंडळी व कलाकारांकडून अनेक सांस्कृतिक व बौद्धिक दृष्टिकोनांवर कार्यशाळेच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होत त्याद्वारे पुरुषत्वाच्या विविध माध्यमांमधील धारणा आदी विषयांवर भर दिला जाणार आहे.

या परिषदेमध्ये बांग्लादेशातील पत्रकार असलेल्या ईशा अरोरा, लेखिक आणि जर्मनीतील #HeForShe चळवळीचा  उद्गाता फिक्री अनिल अल्टीन्टास, भारतातील स्त्रीवादी संशोधिका व लेखिका उर्वशी बुटालीया,  जर्मनीतील सामाजिक विषयांवरील मुक्त सल्लागार फ्लोरिअन फिशर, भारतातील जातीविरोधी कार्यकर्त्या व कादंबरीकार मीना कंदास्वामी, डॉर्टमण्ड विद्यापीठामधील समाजशास्त्र विषयाच्या प्रोफेसर मायकल म्योयझर, अमेरिकेतील ड्युक विद्यापिठातील इतिहास व आंतरराष्ट्रीय तुलनात्मक अभ्यासाच्या प्रोफेसर सुमथी रामास्वामी, भारतातील चित्रपट क्युरेटर, पत्रकार व स्त्रीवादी मीनाक्षी शेड्डे, नव माध्यमांशी संबंधित कलाकार व पुण्यातील वास्तुविशारद अनोखी शाह आदी विविध विषयातील तज्ज्ञ या परिषदेत आपला सहभाग नोंदविणार आहेत.

याशिवाय भारतातील लेखिका, कलाकार व विनोदी कलाकार म्हणून ओळख असलेली आदिती मित्तल, स्पोकन वर्डस कलाकार अनामिका जोशी, नर्तक व नृत्य दिग्दर्शक मनदीप रेखी, कलाकार सुझानं झाख्सं यांबरोबरच जर्मनीमधील चित्रपट निर्माते असलेले केर्स्टिन रिकरमान व सिल्के बेलर हे देखील परिषदेदरम्यान उपस्थित असतील.

याविषयी अधिक माहिती देताना चेन्नईमधील ग्योथे इंस्टिट्युट्सच्या कार्यक्रम समन्वयिक गीथा वेदरमण म्हणाल्या, “ सध्या विविध दृष्टीकोन व स्वरूपांद्वारे पुरुषत्वाची संकल्पना ही एक प्रकारे स्टिरियोटाइप व रोल मॉडेल म्हणून प्रतिबिंबीत केली जात आहे. मात्र भारत व बांग्लादेश या देशांतील प्रचलित परिस्थितीच्या आधारे पुरुषत्व संकल्पना समजून घेण्यावर या परिषदेच्या माध्यमातून आम्ही भर देणार आहोत.” या परिषदेत पुणे, चेन्नई, दिल्ली, ढाका, कलकत्ता व मुंबई या ठिकाणच्या ग्योथे इंस्टिट्युट्सच्या शाखा सहभागी होणार असून पुढील वर्षभर स्थानिक स्तरावर नागरिकांच्या व भागीदारांच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक प्रकल्पांद्वारे या विषयावर त्या काम करीत राहणार असल्याचेही वेदरमण यांनी सांगितले.

याबरोबरच सदर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ग्योथे इंस्टिट्युट्सच्या होमपेजवर अनेक पुरुषांच्या मुलाखती घेत त्या प्रसारित करण्यात आल्या आहेत. ‘खरा पुरुष काय करीत नाही…’ अशी या लघुपटाची संकल्पना असून विविध शहरांतून याविषयी आलेल्या समर्पक उत्तरांचे एकत्रीकरण यामध्ये करण्यात आले आहे.

या परिषदेसाठी इच्छुकांनी  https://bit.ly/RegisterGIM3  या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Reply

%d bloggers like this: