Friday, September 25, 2026
Latest NewsMAHARASHTRA

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर एकूण 14 झोपडपट्टया आहेत. यापैकी बाबानगर येथील झोपडपट्टीला नगर रचनाकार यांनी मान्यता दिली आहे. उर्वरीत 13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता सहसंचालक नागपूर यांना तात्काळ पाठवावे. जेणेकरून शहरातील झोपडपट्टीवासियांना नझुलचे पट्टे वाटप करणे सोयीचे होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झोपडपट्टीधारकांच्या नझुल पट्टे वाटपासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, नगर रचनाकार आशिष मोरे आदी उपस्थित होते.

शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलपट्टे वाटपाबाबत नागपूरच्या धर्तीवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वस्त करून पालकमंत्री म्हणाले, सर्व झोपडपट्ट्यांचा त्वरीत सर्व्हे करा. त्यांचे नकाशे मंजूरीकरीता नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाला त्वरीत पाठवा.

शहरातील 14 झोपडपट्ट्यांमध्ये एकूण 4815 कुटुंबांचे वास्तव्य आहे. 17 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबांची संख्या 380 आहे.  झोपडपट्टी अभिन्यासामध्ये आवश्यक ती खुली जागा तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यास मंजूरी प्रदान करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच शिथिलीकरण प्रस्तावात खुली जागा, रस्त्यांची रुंदी, त्यांचे मोजमाप, रस्त्याचे रुंदीकरण, प्रत्येक भुखंडास पोचमार्ग आदी त्रृट्यांची पुर्तता करून सुधारितरित्या प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार नगर रचना कार्यालयाकडून कारवाई सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचे उद्घाटन : महापारेषणच्या सीएसआर फंडातून जिल्ह्याला मिळालेल्या 30 लसीकरण वाहनांचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासाठी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून 30 लसीकरण गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन गाड्या याप्रमाणे जिल्ह्यातील 15 तालुक्यांना या गाड्या देण्यात येतील. त्यामुळे निश्चितच लसीकरणाचा वेग वाढेल. विशेष म्हणजे गावागावातील जे नागरीक प्रवास करून लसीकरणाकरीता येऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत हे वाहन पोहचणार आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करणे व जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करणे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading