लेखक, संपादक आनंद अंतरकर यांचे निधन

पुणे : ‘हंस ‘ , ‘ मोहिनी ‘ व ‘ नवल ‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ च्या सुमाराला दुःखद निधन झाले . त्यांचे वय ८० होते .सुमारे महिन्यापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या . त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली . रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते.


त्यांच्या पश्चात् त्यांची पत्नी प्रियदर्शिनी ( कै . ग दि . माडगूळकर यांची कन्या ) , पुत्र अभिराम , कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत . सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर , लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी .
हॉस्पिटलमधे जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बव्हंशी पूर्ण केले होते . ७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोचणार आहेत , अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली .
आनंद अंतरकरांच्या निधनाने उत्तम सजावट आणि अनुभवी तसेच नवोदित लेखकांच्या कसदार साहित्याने नटलेल्या मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: