Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोविडमुळे विधवा झालेल्या महिला व निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार

  • अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज
  • शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार
  • सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या
  • कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार

मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये  वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ  बालकांच्या  कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची  माहिती देतील. तसेच विविध  योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे  सादर करतील.

या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार असणार आहेत. यामध्ये ज्या ज्या शासकीय योजनेसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरुन घेऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत. याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क यासंबंधाने काम केले जाणार असून मदत पुरवण्यात येणार आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये आतापर्यंत मार्च, 2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी आई- वडिलांपैकी एक पालक कोरोनामुळे गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडिल गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 570 बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आम्ही हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading