Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जनता कुंभकर्णासारखी झोपली; मग जाचक कायदे होणारच – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

राळेगणसिद्धी : आता सरकार वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करीत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये मग काय होणार. त्यामुळे आता जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्ती केलं. ते देशबचाव जनआंदोलन समितीशी बोलत होते.

गेल्या आठवड्यात जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेलं सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचं आवाहन अण्णा हजारेंना केलं होतं. अन्यथा केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज देश बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले.  यावेळी अण्णा हजारे बोलत होते. याप्रसंगी ऍड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, ऍड. देविदास शिंदे उपस्थित होते.

अण्णा म्हणाले, माझ वय ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू, देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत आवश्य येईल.  देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही.

 पुढे अण्णा म्हणाले, शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभं करा, मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गाने जात आहात, तेव्हा मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी संपर्क नाही

दिल्लीत ८ महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांला तुम्ही पाठबळ द्या, अशी विनंती मारोती भापकर यांनी अण्णा हजारे यांना यावेळी केली. त्यावर अण्णा म्हणाले, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही. तसेच शेतकरी प्रश्नी पाच वर्षांपासून आपण पाठपुरावा करतोय. केंद्रीय कृषीराज्यमंत्र्यांनी देखील आपल्याला कृषी कायद्यांसंदर्भात उच्च स्थरीय समिती नेमण्याचा शब्द दिलाय. कोरोनामुळे समिती स्थापन झाली नाही. मात्र तरी आपण पाठपुरावा करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading