इंडियन बँकेतर्फे मेगा रिटेल कर्ज मोहीम

मुंबई : इंडियन बॅंकेची मेगा रिटेल कर्ज वितरण मोहीम बॅंकेचे कार्यकारी संचालक इम्रान अमीन सिद्दीकी यांच्या हस्ते आज मुंबईत सुरू झाली. त्यांनी मोठ्या संख्येने कर्जदारांना मंजुरीची पत्रे दिली.

यावेळी इम्रान अमीन सिद्दीकी म्हणाले, कोविडचा प्रभाव कमी झाल्यामुळे बँक अशा मोहिमांचे आयोजन करून नवीन व विद्यमान ग्राहकांपर्यंत सक्रियपणे पोहोचत आहे. कर्जविषयक प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करून कर्ज मिळवण्याचा ग्राहकांचा अनुभव समाधानकारक बनविण्याकरीता बॅंक विविध पावले उचलत आहे, तसेच किरकोळ व एमएसएमई या प्रकारांतील कर्जांना मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी करण्याचे लक्ष्य बॅंकेने ठेवले आहे. सिद्दीकी यांनी यावेळी निष्ठावंत ग्राहकांच्या प्रदीर्घ व सततच्या संबंधांची प्रशंसा केली आणि बॅंकेची उत्पादने व प्रक्रिया यांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्राहकांकडून सूचना व अभिप्राय मागविले.

बॅंकेचे एफजीएम रोहित ऋषी म्हणाले, बँकेने किरकोळ आणि एमएसएमई कर्जांचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. चालू महिन्यात 528.83 कोटी रुपयांची 2464 कर्जे बॅंकेने मुंबईत मंजूर केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई येथील एफजीएम कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुंबई, अहमदाबाद, सुरत, पुणे व नागपूर येथील सर्व कार्यक्षेत्रांमध्ये मेगा रिटेल कर्ज वितरण शिबिरे घेण्यात येत आहेत. गृहकर्जे, वाहन कर्जे, व्यक्तिगत कर्जे यांच्यावर या शिबिरांत भर देण्यात येत असून त्यामध्ये ग्राहकांना स्पर्धात्मक व्याजदर व आकर्षक सवलतीही देण्यात येत आहेत. आदल्या दिवशी  सिद्दीकी यांनी सायन सर्कल शाखेचे उद्घाटन केले. ही बँकेच्या मुंबई दक्षिण विभागांतर्गत असलेली 62वी शाखा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: