fbpx

‘परीस’ मधून अंधश्रद्धेवर भाष्य

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फार अस्पष्ट अशी रेषा आहे. श्रद्धेची कधी अंधश्रद्धा होईल, हे सांगता येत नाही. अंधश्रद्धेवर आधारित ‘परीस’ ही सस्पेन्स थ्रीलर असलेली वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातील बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर वेबसीरिजची निर्मिती करणे हे ‘प्लॅनेट मराठी’चे धाडसी आणि तेवढेच कौतुकास्पद पाऊल म्हणावे लागेल. या वेबसीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘वन कॅम प्रॅाडक्शन’ प्रस्तुत ‘परीस’ या वेबसीरिजची कथा मयूर करंबळकर यांची आहे.

सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो? त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ३१ ऑगस्ट रोजी आपल्याला मिळणार आहेत. संवाद, दिग्दर्शन, छायाचित्रण,कलाकार यांची एक उत्तम भट्टी या वेबसिरीजमध्ये जमून आल्याचे ट्रेलर मधून दिसते. या वेबसीरिजचे छायाचित्रण सोपान पुरंदरे यांनी केले आहे.

‘परीस’ बद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आत्तापर्यंत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या इतर वेबसिरीजप्रमाणे या वेबसिरीजचा विषयही पूर्णपणे वेगळा आहे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून त्यासाठी अनेकदा माणसांचा, जनावरांचा प्रसंगी जन्मजात बाळाचाही बळी दिला जातो. विकृत कृत्ये केली जातात. याविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या वेबसिरीजची निवड करण्यात आली आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ ने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांचा विचार केला आहे. हा विचार केवळ वयोगटापुरताच मर्यादित नसून शहरी, ग्रामीण अशा सगळ्याच प्रेक्षकांचा, त्यांच्या मनोरंजनाचा विचार करून कंटेंट आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ३१ ऑगस्टपासून वेगवेगळ्या विषयावरच्या पाच वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर येत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: