सातारा -साहित्यव्यवहारात दांभिकता असता कामा नये – डॉ.नागनाथ कोतापल्ले
सातारा : साहित्याच्या व्यवहारात कोणाचीतरी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला जातो, तर कोणाला तरी गालबोट लागेल असाही प्रयत्न केला जातो. म्हणूनच साहित्यव्यवहारात दांभिकता, खोटेपणा असता कामा नये. प्रा. विश्वास वसेकर हे साहित्याच्या निर्मानाकडे विनम्र होऊन जातात, विनम्र झाल्यामुळेच त्यांना निर्माणाची रहस्यपूर्ती सांगता येते, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक पूर्व कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.
लेखक प्रा. विश्वास वसेकर यांच्या ‘ ऋतू बरवा ‘या ललितगद्यावर वाङमयीन परिचर्चा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मसापचे पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. कोतापल्ले पुढे म्हणाले, मानवी वाटचालीमध्ये सृष्टी म्हणजे काय आहे? अशा प्रकारचे लेखन फार कमी होते. सृष्टीचे चैतन्य आपल्या मध्ये आहे हे आपण विसरत चाललो आहोत. साहित्य, संस्कृती, कविता यापासून आपण जसजसे दूर होत चाललेले आहोत त्यामुळे नैसर्गिक प्रेरणा कमी झाल्या. निसर्ग जसजसा आपल्यापासून दूर झाला तस तसे आपले जगणे यांत्रिक व स्वार्थी पद्धतीचे झाले आहे. आपण ग्रामीण भागाकडून महानगरांकडे जात आहोत. वसेकर यांचे हे पुस्तक आपणास सांगेल की तुम्ही कुठून सुरुवात करून शेवट कोठे केलेली आहे. गझले वरती चांगले पुस्तक कोणते असेल तर ते वसे करांचे आहे. उर्दू भाषेतला बारकावा लक्षात यावा इतका त्यांचा अभ्यास आहे. ज्याला साहित्याची उत्तम समज आहे त्यालाच विडंबन कविता लिहिता येते. साहित्य संस्कृतीचे निरीक्षण वसेकर करतात. त्यांना प्रवासाची मोठी आवड आहे. त्यामुळे त्यांनी प्रवासवर्णने लिहिलेले आहेत. जवळजवळ सगळेच वाङमय प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत.
प्रा.विश्वास वसेकर म्हणाले, माझे व कोतापल्ले यांचे नाते गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून चे आहे. गेल्या 40 वर्षांपासून त्यांची कृपादृष्टी माझ्यावर आहे. वेळोवेळी माझ्या उणीवा त्यांनी दाखवून दिल्या आहेत. त्यांनीच माझी जडणघडण केली. हिंदी साहित्य मला खूप आवडते. यावेळी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
