180-200 सीसीमधे होंडाने तयार केला नवा ट्रेंड, लाँच केली नवी CB200X
नवी दिल्ली: वेगाने विकसित होत असलेल्या 180- 200 सीसी मोटरसायकल क्षेत्रात नवा ट्रेंड प्रस्थापित करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज भारतात नवी CB200X लाँच केली. अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आलेली ही गाडी दैनंदिन वापरासाठी तसेच नव्या वाटा धुंडाळण्यासाठी सर्वोत्तम आहे. नवी CB200X शहरातील धकाधकीच्या रस्त्यांवर तसेच वीकेंडला शहरापासून दूर निवांत प्रवासाला जाण्यासाठी योग्य आहे.
3 नव्या पेटंट अर्जांची जोड लाभलेली CB200X होंडाच्या नाविन्यपूर्णतेचा उत्कृष्ट नमुना असून ग्राहकांच्या अपेक्षांच्या पलीकडे जात वाहनप्रवासाचे भविष्य दर्शवणारी आहे.
या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘होंडाच्या प्रख्यात सीबी गाडीच्या वारशापासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेली नवी मोटरसायकल लाँच करताना मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय तरुणांची, त्यांच्यासारख्या शहरी मुसाफिराची बदलती जीवनशैली लक्षात घेऊन CB200X तयार करण्यात आली आहे. ही गाडी आजच्या तरुणांना नवनव्या वाटा धुंडाळण्यासाठी प्रेरणा देणारा अनुभव देते. रायडर्सचा उत्साह वाढवण्याच्या हेतून तयार करण्यात आलेली CB200X शहरातील दैनंदिन प्रवासासाठी तसेच वीकेंडला शहरापासून दूर सुट्टी घालवण्यासाठी जातानाची उत्तम साथीदार आहे.’
याविषयी अधिक माहिती देत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘180- 200 सीसी क्षेत्रात स्थिर क्रांतीचा टप्पा आणणारी CB200X ही तरुणांसाठी तयार करण्यात आलेली खास शहरी गाडी आहे. तिचे डिझाइन होंडाच्या उच्च दर्जाच्या साहसी बाइक्सवरून घेण्यात आले आहे. गाडीचे एकंदर डिझाइन रायडरला ताठ तरीही आरामात बसण्यायोग्य असून त्यामुळे शहरातील तसेच शहराबाहेरचा प्रवासही सुखद होतो. दमदार कामगिरी करणाऱ्या या गाडीचे इंजिन ताकदवान टॉर्क तसेच उच्च आरपीएम देणारी आहे. गाडीचे अनोखे नकल कव्हर्स आणि इंटिग्रेटेड एलईडी विंकर्स, गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स व इतर वैशिष्ट्यांमुळे CB200X रस्त्यावर उठून दिसते, शिवाय तिचा राकटपणा कोणालाही भुरळ घालणारा आहे. शहरी रस्ते असो किंवा इतर CB200X तुम्हाला प्रत्येक राइडसह नव्या वाटा शोधण्याची प्रेरणा देते.’
