आता मुलींनाही मिळणार एनडीए मध्ये प्रवेश
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या निकालानुसार आता मुलीही नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA)ची परीक्षा देवू शकणार आहेत. त्यामुळे मुलींना एनडीएमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत मुलींना या परीक्षेस बसण्याची परवानगी नव्हती. पण, सुप्रीम कोर्टाच्या या निर्यामुळे यंदा पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे. दरम्यान, NDAची प्रवेश परीक्षा येत्या 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. ‘एनडीए परीक्षेत प्रवेशासाठी पात्र महिला उमेदवारांना वगळणे घटनात्मकदृष्ट्या न्याय्य असू शकत नाही आणि ते पूर्णपणे लिंगावर आधारित आहे.’, असे या याचिकेत म्हटले होते. यावर निकाल देताना न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आणि म्हटले की, “जेव्हा देशाच्या सैन्यात महिला आणि पुरुषांना समान संधी देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा केंद्राने आपली मानसिकता बदलायला हवी. या प्रकरणात घेतलेला धोरणात्मक निर्णय हा लिंगभेदावर आधारित आहे”. पुढे जाऊन कोर्टाने म्हटले आह की, “आम्हाला आदेश द्यावा लागण्यापेक्षा लष्कराने स्वतःच या विषयी पावले उचलावीत असे आम्हाला वाटते. सरकारने आम्हाला आदेश पारित करण्यास भाग पाडू नये.”
यावेळी नाराज न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरलला विचारले की, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सैन्यात महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णयानंतरही या दिशेने काहीच का केले गेले नाही.यावर केंद्र सरकारने आपली बाजू मांडत म्हटले आहे की, ‘सरकारने केलेल्या भरती धोरणात कोणताही भेदभाव नाही आणि असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे महिला अर्ज करू शकतात.’
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
