‘टास्क-फोर्स’ ची शाळा सुरू न करण्याची भूमिका अशास्त्रीय – जन आरोग्य अभियान
पुणे : टास्क-फोर्स’ ची शाळा सुरू न करण्याची भूमिका अशास्त्रीय आहे. शाळा बंद ठेवल्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसाना बरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य ही बिघडले आहे. अंगणवाड्या, शाळा बंद केल्याने तिथे मिळणारा शिजवलेला पूरक आहार बंद झाला. त्यामुळे गरीब स्तरातील मुलांमधील कुपोषण वाढले आहे. या वाढीव कुपोषणामुळे त्यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुयोग्य मापदंड पाळून व पूर्व-तयारी करून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
जन आरोग्य अभियान, राज्य समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, बहुसंख्य विकसित देशांमध्ये लॉकडाउन चे दिवस वगळता शाळा चालू ठेवल्या आहेत. भारतातील बाल-आरोग्य-तज्ञांच्या समितीने शिफारस केली आहे की, पॉझिटिव्हीटी रेट ५% पेक्षा कमी असलेलेल्या आणि दर लाख लोकसंख्ये मागे रोज २० पेक्षा कमी नवीन केसेस असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू कराव्यात. या पार्श्वभूमीवर सुयोग्य मापदंड पाळून अंगणवाड्या व शाळा लवकर सुरू कराव्यात. यासंदर्भात पत्रकात खालील मुद्दे मांडण्यात आले आहेत.
१) आय.सी.एम.आर.च्या जुलै-अखेरी प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षानुसार भारतामध्ये सरासरी ६७% जनतेमध्ये कोव्हिड-१९ ची लागण होऊन गेली आहे व सहा वर्षांवरील मुलांमध्येही लागणीचे प्रमाणही तेव्हढेच आहे. म्हणजे शाळा बंद ठेवूनही शालेय वयोगटात लागणीचे प्रमाण सारखेच आहे. तसेच ‘कोव्हिड-१९’ ने दगावलेल्या मुलांचे प्रमाण एकूण कोव्हिड-मृत्यूमध्ये ०.५% सुद्धा नाही. मग शाळा बंद ठेवून मुलांचे नुकसान का करायचे?
२) लहान मुलांमध्ये कोव्हिड मुळे multisystem inflammatory syndrome हा गंभीर आजार होऊ शकतो हे खरे आहे. हा धोका टाळण्यासाठी लहानपणापासून होणारा मधुमेह, जादा वजन, काही गंभीर आजार/आरोग्य-प्रश्न असणा-या मुलांना सध्या शाळेत पाठवू नका, असे पालकांना सांगता येईल.
३) शाळेत येणाऱ्या मुलांमुळे घरातील जेष्ठ-व्यक्तीना लागण होण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत अशा लोकांपैकी बहुसंख्य लोकांचे प्राधान्याने लसीकरण झाले आहे. त्यामुळे हे कारणही शाळा बंद ठेवण्यासाठी सयुक्तिक नाही.
४) जागतिक आरोग्य-संघटना किंवा भारतातील बाल-आरोग्य तज्ञांची संघटना यांनी मुलांचे लसीकरण होणे ही शाळा उघडण्याची पूर्वअट ठेवलेली नाही. त्यामुळे लस येई पर्यंत मुलांची शाळा बंद ठेवणे योग्य नाही. शिवाय लस यायलाही काही महीने लागणार आहे.
