fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsLIFESTYLEPUNE

अवयवरूपी क्राऊन परिधान करत डॉक्टर सौंदर्यवतींची अवयवदान जागृती

पुणे : डोळे, हृदय, किडनी, फुफुसे, त्वचा, आतडे, स्वादुपिंड अशा आकारातील क्राऊन डोक्यावर घालत डॉक्टर असलेल्या सौंदर्यवतींनी वॉक केला. शरीराने आपण मेलो, तरी आपण अवयवरूपी जगावे, असा संदेश या डॉक्टरांनी दिला. डॉ. प्रचिती पुंडे (किडनी), डॉ. मुग्धा बर्वे (हृदय), डॉ. अंजली आवटे (फुफुसे), डॉ. योगिता रोहकले (डोळे), डॉ. कीर्ती जळकोटे (त्वचा), डॉ. रोहिणी (स्वादुपिंड) आणि डॉ. सुप्रिया वायगावकर (आतडे) यांनी वॉक करत त्या त्या अवयवाबाबत जनजागृती केली.

निमित्त होते, जागतिक अवयवदान दिनानिमित्त निशरीन पूनावाला यांच्या संकल्पनेतून ब्युटीफुल मॅगझीनच्या वतीने रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या सहकार्याने नेहा जोशी फाउंडेशन करिता आयोजित जनजागृती कार्यक्रमाचे. दान करता येणारे, प्रत्यारोपण होऊ शकणारे अवयव, दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया याविषयी जनजागृती करण्यात आली. अवयवदानाचा संकल्प यावेळी करण्यात आला. गौरी शिकारपूर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव, नेहा जोशी फाउंडेशनचे संस्थापक राहुल जोशी, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षा डॉ. सिमरन जेठवानी, संयोजिका निशरीन पुनावाला आदी उपस्थित होते.

नेहा जोशी यांना अवयवदाता मिळाला नाही. त्याअभावी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी, तसेच इतर गरजू रुग्णांना अवयव उपलब्ध व्हावेत, यासाठी अवयवदान जागृती करण्याच्या उद्देशाने नेहा जोशी यांचे पती राहुल जोशी यांनी या फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी या डॉक्टर्स वॉकचे आयोजन केले होते.
गौरी शिकारपूर म्हणाल्या, “अवयवदानाबाबत अजूनही लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाचे जागृतीपर कार्यक्रम घेणे महत्वाचे आहे. अवयवदान करून आपण अनेकाना एक नवे आयुष्य देऊ शकतो.” कोणतीही गोष्ट करताना त्याला सौंदर्याची जोड दिली, तर लोक त्याला अधिक गांभीर्याने घेतात. त्यामुळे डॉक्टर सौंदर्यवतींच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अवयवदानाबाबत जागृती करण्यात आली. यापुढेही लोकांनी अवयवदान करावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, असे निशरीन पूनावाला यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading