Thursday, November 19, 2026
ENTERTAINMENTLatest News

काश्मीरी कलाकारांच्या सहभागातून “अमन का आशियाँ”

पुनीत बालन स्टुडिओज आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स यांनी “अमन का आशियाँ” या खास गाण्याची निर्मिती केली आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने हे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, विशेष म्हणजे काश्मीर खोऱ्यातील युवा कलाकारांचा या गीत निर्मितीमध्ये सहभाग आहे.

पुनीत बालन यांना त्यांच्या काश्मीर भेटींदरम्यान तेथील स्थानिकांशी झालेल्या संवादातून काश्मीरमध्ये संगीताविषयी असलेलं अपार प्रेम आणि तेथील गुणवान कलाकारांना संधी मिळत नसल्याचं जाणवलं. त्यातूनच काश्मीरी कलाकार आणि अन्य कलाकारांच्या सहभागातून गाण्याची निर्मिती करण्याची कल्पना पुढे आली. पुनीत बालन म्हणाले, “काश्मीर खोऱ्यातील आतापर्यंत अलक्षित कलावंतांना पुढे आणताना मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या प्रकल्पासाठी सहकार्य केले, त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.”

चिनार कॉर्प्सचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल देवेंद्र प्रताप पांडे यांनी पुनीत बालन स्टुडिओजला या गाण्याच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘काश्मीरी तरुणांपर्यंत पोहोचून, त्यांना मदत करून, त्यांच्या कलेला मोठ्या स्तरावर नेण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं हे मोलाचं काम आहे. “अमन का आशियाँ” या गाण्यातील आशेची संकल्पना आमच्या हृदयाच्या जवळची आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

“अमन का आशियाँ” या गाण्याची संकल्पना आणि निर्मिती पुनीत बालन स्टुडिओजनं केली आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं गाणं सौरभ भालेराव आणि जसराज जोशी यांनी संगीतबद्ध केलं आहे. काश्मीर खोऱ्यातील वासीम खान, इक्बाल हुसेन, शाह जफर या युवा गायकांनी गाणं गायलं आहे, तसंच प्रियांका बर्वे, जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी सहगायन केलं आहे. काश्मीरमधील २१ वर्षीय रबाबवादक अदनान मंझूर यानं या गाण्यासाठी रबाबवादन केलं आहे.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात १५ चिनार कॉर्प्सचे कोअर कमांडर लेफ्ट. जन. देवेंद्र प्रताप पांडे, ब्रिगेडियर रुपेश मेहता, पुनीत बालन, जान्हवी धारिवाल आणि चिनार कॉर्प्सच्या अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “अमन का आशियाँ” हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

Leave a Reply