‘आयसीएआय’तर्फे कौशल्य विकासासाठी ‘टेल’ उपक्रम
पुणे : सनदी लेखापालाचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना रोजगार व अनुभव मिळावा, त्यांच्यातील कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘ट्रेन, अर्न अँड लर्न’ (टेल) हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए मनीष गादिया यांनी दिली. ‘आयसीएआय’च्या वतीने कोरोनानंतरच्या ‘न्यू नॉर्मल’मध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, विविध बदल, विद्यार्थी व सीएंसाठी आणलेल्या तरतुदी याविषयी यावेळी माहिती देण्यात आली.
‘आयसीएआय’च्या वतीने ‘सहकार’ विषयावर आयोजित दोन दिवसीय रिफ्रेशर कोर्सच्या निमित्ताने ‘डब्ल्यूआयआरसी’चे पदाधिकारी पुणे भेटीवर आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसंगी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’च्या उपाध्यक्षा सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, ‘विकासा’चे अध्यक्ष सीए यशवंत कासार, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए उमेश शर्मा, पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
सीए मनीष गादिया म्हणाले, “नोकरी अथवा व्यवसाय करण्यापूर्वी सनदी लेखापालातील नवनवी कौशल्य विकसित व्हावीत, तसेच शिकतानाच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना सीएकडे इंटर्नशिप देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर त्याला मानधन मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद हे या उपक्रमाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुलभ मार्गाने सीए परीक्षेसाठी आवश्यक साहित्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नेहमी शासनाला मदत होत असते. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात चार्टर्ड अकाउंटंट्सची मागणी आहे. सहकार क्षेत्रात सनदी लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने या दोन दिवसांच्या चर्चासत्रात विचारमंथन झाले. येत्या काळात सहकार क्षेत्राला अधिकाधिक गती देण्यासाठी सनदी लेखापाल आपले योगदान देतील.” सीए समीर लड्डा म्हणाले, “सनदी लेखापालाचा अभ्यासक्रम हा शहरी भागातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही सीए होणे सुलभ झाले आहे. पुणे शाखेच्या वतीने सीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केले जाते. सीए विदयार्थी आणि सभासद यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.”
