लोकमान्यांचे स्वदेशी लशीचे स्वप्न सीरमने पूर्ण केले ः डॉ. सायरस पूनावाला
पुणे ः स्वदेशी लस तयार करण्याचे लोकमान्य टिळक यांचे स्वप्न सीरम इन्स्टिट्युटने पूर्ण केले, अशी भावना सीरम समूहाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विश्वस्त आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विश्वस्त डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक उपस्थित होते.
डॉ. पूनावाला म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्या नावे पुरस्कार स्विकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. लोकमान्य टिळक यांनी 1889 मध्ये स्वदेशी लशींचा कारखाना भारतामध्ये तयार होणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित केला होता. हडपसर येथे 1966 साली लस तयार करण्याच्या एका लहान उद्योगापासून सुरू केलेली सीरम इन्स्टिट्यूट आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. लस तयार करण्यापेक्षाही त्याच्या परवानग्या मिळवण्यामध्ये मोठ्या अडचणी येतात. कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध होण्यापूर्वी परवानग्या देत असताना नोकरशाही अनेक अडचणी उभ्या करते. मात्र, कोव्हिशील्डच्या निर्मितीत केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ’परवाना राज’चा अडथळा आला नाही.
सीरमने अगदी कमी वेळेत लस तयार केली. कंपनीने स्वतः जोखीम उचलून 10 कोटी लस तयार केल्या होत्या. यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात?आली होती. आजही हजारो कोटी रूपयांची थकबाकी आहे. मात्र, नागरीकांसाठी महत्त्वाची असणारी लस वेळेत पोहचवण्याचे काम कंपनीने केल्याचे डॉ. पूनावाला यांनी नमूद केले.
शिंदे म्हणाले, एकशेवीस वर्षापुर्वी देशात प्लेगची साथ असताना लोकमान्य टिळकांनी स्वदेशी लशीचे केंद्र पुण्यात व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. लोकमान्य टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सायरस पूनावाला यांनी केला आहे. लोकमान्य टिळक आज जिवंत असते तर स्वदेशी लस पुण्यात तयार झाली म्हणून त्यांनी सायरस पूनावाला यांचे कौतुक केले?असते. सीरम इन्स्टिट्यूटने केलेले संशोधन जागतिक पातळीवर देशाचा अभिमान वाढवणारे आहे. भारताच्या दृष्टीने फार मोठे यश आहे. कोरोना लशीमुळे पुणे सांस्कृतिक शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्राबरोबरच कोव्हिशील्ड लशीमुळे आता संशोधनाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाईल. याचे श्रेय पूनावाला यांना जाते.
