fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

निर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी मात्र वाढली आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण निर्बंध शिथिल केले असेल आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे तर देशासमोर कसे आव्हान उभे ठाकले आहे ते अजून ताजे आहे. आणि म्हणूनच यावेळी राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे.

यापुढे राज्यातील  कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल. आपणास माहीत आहे की, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की ( सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

गेल्या पावणे दोन वर्षांत कोविडने खूप काही शिकवले आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो   आहोत, आणि मला खात्री आहे शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य कराल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, मी परत सांगतो, निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. कोविडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटनमध्ये सुद्धा परत मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे.  अशा परिस्थितीत आपल्यालाही सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. परवा आपण मर्यादित प्रमाणात का होईना पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत.

इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading