दीप अमावस्येला म्हसोबा मंदिरासमोर ५११ पारंपरिक दिव्यांचा दीपोत्सव
पुणे : लामण दिवा… दगडी दिवा… जुन्या समया आणि फिरत्या पणत्या अशा ५११ दिव्यांनी मंडईतील म्हसोबा मंदिराचा परिसर उजळून निघाला. दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हसोबारायाला नमन करण्यात आले. फिरत्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराला केलेली फुलांची सजावट अधिक आकर्षक दिसत होती.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येला दीपोत्सव करण्यात आला. यावेळी प.पू.कालीचरण महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, हर्षद पोरे, शेखर पवार, दिनेश पिसाळ, गौरव घोडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विजय जाधव, वैशाली जाधव, सदाशिव सूर्यवंशी, रंजना सूर्यवंशी यांच्या हस्ते कालीचरण महाराजांचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानतर्फे गायनसेवा अर्पण करण्यात आली. मंदिराकरीता वर्षभर सेवा देणा-या सेवकांना धान्य किट देखील देण्यात आले. धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय आहे. धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल हे ब्रीद अंगिकारुन यंदाचा उत्सव सुरु आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना घरबसल्या हजारो भाविक पहात असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
