Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

Pune – मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक येथे केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्यामुळे आंदोलन करून निषेध केला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘आज केंद्रातील मोदी सरकारने देशाचे भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या नावाने दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्याला हॉकीचे जादूकर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव दिले. काँगेस पक्षाला हॉकीचे  जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध नसून नरेंद्र मोदी हे खेळामध्ये राजकारण आणू पाहत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव दुसऱ्या पुरस्काराला देखील दिले असून भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचे नाव खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मोदी सरकारने आपल्या संकुचीत व संघीष्टवृत्तीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नाव बदलून स्वत:च्या नावावर करणारे व दिल्लीच्या स्टेडियमला अरूण जेठली यांचे नाव देणारे कोणत्या खेळात प्राविण्य घेतलेले आहे हे त्यांनी सांगावे.’’

 प्रदेश चिटणीस संजय बालगुडे म्हणाले की, ‘‘नरेंद्र मोदी यांनी राजीवजींच्या बलिदानाचा अपमान केला असून कोणताही क्रीडाप्रेमी त्यांना माफ करणार नाही. ज्या पध्दतीने मोदी क्रीडा क्षेत्रात राजकारण आणित आहेत यावरून केवळ देशातील मुळ प्रश्नांना बगल देण्याचे काम मोदी करीत आहेत. आजच्या या पुरस्काराचे नाव बदलल्याचा मी जाहिर निषेध करतो.’’

 नगरसेवक अविनाश बागवे यांनी सदर आंदोलन जो पर्यंत नरेंद्र मोदी पुरस्काराचे नाव पुन्हा स्व. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार करीत नाहीत तो पर्यंत आंदोलन चालू राहील असे म्हणाले.

 यावेळी कमल व्यवहारे, नीता रजपूत, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, द. स. पोळेकर, दिलीप शेवाळे, भरत सुराणा, हेमंत राजभोज, सुधीर काळे, विश्वास दिघे, दादा भोंदे, साईनाथ भंडगे, राकेश भिलारे, सिमा महाडिक आदी उपस्थित होते.

Leave a Reply