“रंग विठ्ठला” गाण्यातून कलाक्षेत्राचे विठ्ठलाला साकडे
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात कलाक्षेत्रावर अवलंबून असलेले लोककलावंत, गायक, वादक, तंत्रज्ञ, चित्र व नाट्य कलावंत, चित्रकार, नृत्य कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट याबरोबरच कलाक्षेत्रातील विविध विभागातील सुमारे 25 लाख लोकांचे काम बंद आहे. आता यांचं पुढे काय? हा विचार घेऊन, या संकटातून आम्हाला बाहेर काढ आणि रसिक प्रेक्षकांची व आमची लवकरात लवकर भेट होऊ दे व “पक्षास जसे मिळते आभाळ तसे व्हावे, गजबजून यावे गोकुळ अन निर्भय नांदावे” या शब्दात कलाकार आणि रसिकांच्या वतीने विठ्ठलाला साकडे घालणारे निनाद-किरीट प्रस्तुत व डॉन स्टुडिओज निर्मित “रंग विठ्ठला” या गाण्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
संदीप खरे लिखित या गाण्याची मूळ संकल्पना आणि दिग्दर्शन धवल पाठक यांची आहे, तसेच निनाद सोलापूरकर व किरीट मांडवगणे यांनी संगीत दिले आहे, तर छायांकन ईशान जोशी, अथर्व भागवत, धवल पाठक यांनी केले आहे. पंचम स्टुडिओ येथे रेकॉर्डिंग झालेल्या या गाण्याचे मिक्सिंग अजय अत्रे यांनी केले आहे तर विशेष बाब म्हणजे गाण्याचं मास्टरींग इंग्लंड मध्ये झालं असून ते डोनल व्हेलन यांनी केले आहे. हा लोकार्पण सोहळा मेघराज राजेभोसले, अविनाश चंद्रचूड, समीर हंपी, राहुल सोलापूरकर, रोहित नागभिडे, जितेंद्र अभ्यंकर, मिलिंद ओक, संदीप खरे, प्रदीप वैद्य, जितेंद्र भुरुक, विभावरी देशपांडे, विनोद सातव, हेमंत गुजराती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
संदीप खरे म्हणाले “हे जर लवकरात लवकर संपलं नाही तर अनेक चुली थंडावणार आहेत. आर्थिक व्यवहार बाजूला ठेवला तरी कुठल्याही कलाकाराची एक आस असते की त्याला त्याचं कलाकारपण हे तो स्टेजवर उभं राहून जेव्हा कला सादर करतो आणि समोरून बेहोशी मध्ये दाद येते, वाहवा येते तेव्हा मिळतं. त्यानी पोट भरत नाही ही गोष्ट खरी असली तरी मन भरणं ही एक प्रक्रिया असते आणि त्यावाचून मनुष्य अर्धवट असतो, ऑनलाइन कार्यक्रम सुरू आहेत पण प्रत्यक्षात हा जल्लोष अनुभवता येत नाही. या सगळ्या परिस्थितीची जी प्रतिक्रिया झाली ती आम्हा कलाकारांतर्फे गीताच्या आणि व्हिडीओच्या रूपाने प्रकट करण्याचा व आमची जी तळमळ, कळकळ आहे ती पोहोचवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.”
