धर्मजागरणाचे काम प्रत्यक्ष कृतीतूनच व्हावे : ह.भ.प. मोरेश्वर जोशी
पुणे : संतांच्या पुण्याईवर आपण जगतो आहोत. आपल्या हातूनही पुण्यकर्म झाल्यास भविष्यातील आपल्या पिढ्या सुखा-समाधानाने जगू शकतील. पाश्चात्यांचे अनुकरण करावे की आपली संस्कृती जोपासावी यात तरूण पिढी गोंधळलेली आहे. पौरोहित्य करणारे गुरूजन आणि कीर्तनकार यांच्यावर समाजाची श्रद्धा आहे. आपले काम धर्मजागरणाचे आहे आणि ते प्रत्यक्ष कृतीतूनच होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांनी केले.
पुरोहित व कीर्तनकार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिर व समस्त ब्राह्मण सेवा संस्था, कोथरूडतर्फे आज सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी जोशी पुरोहित आणि कीर्तनकार यांच्याशी संवाद साधला. कोथरूड परिसरातील 51 पुरोहित व कीर्तनकार यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. माजी मंत्री शशिकांत सुतार, सुभाष टांकसाळे, कीर्तनकार स्मीता विलास देशपांडे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, डॉ. संदिप बुटाला, गणेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ह.भ.प. जोशी म्हणाले, धर्मसंस्कृती टिकविण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा हा सन्मान आहे. हे धर्मपीठ परंपरेने निर्माण झाले आहे. या परंपरेचे आपण पाईक आहोत. धर्म जागरण आणि संस्कृती रक्षणाचे आपले काम असून ते प्रत्यक्ष कृतीतूनच होणार आहे. प्रत्येकजण प्रपंचात गुंतला आहे. कठीण परिस्थितीत दुसर्याला कशी मदत करता येईल याचा विचार व्हावा. वेद घोषाने वातावरण शुद्ध होते तर कीर्तनाने समाज एकत्र येतो. आजच्या पिढीला संतपरंपरेविषयी काही माहिती नसल्याचे त्यांनी काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
सोहळ्याच्या आयोजनाविषयी कीर्तनकार स्मीता देशपांडे, सुभाष टांकसाळे, अभय तपस्वी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी प्रास्ताविकात माहिती देऊन डॉ. संदिप बुटाला यांनी, पौरोहित्य करणारे तसेच कीर्तनकार कोरोना योद्धेच असल्याचे मत नोंदविले.
मान्यवरांचा सत्कार पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. गोपाळ कुलकर्णी यांनी आशीर्वचन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वाराणशीकर यांनी केले तर प्रफुल्ल सुभेदार यांनी आभार मानले.
