fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

मंडई म्हसोबा ट्रस्टतर्फे यंदा विधायक व धार्मिक म्हसोबा उत्सव

पुणे : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव यंदा गुरुवार, दिनांक ५ आॅगस्ट ते रविवार, दिनांक ८ आॅगस्ट दरम्यान महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे वैशिष्टय असणार आहे. धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल हे ब्रीद अंगिकारुन यंदाचा उत्सव होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी व विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी दिली. 

श्रद्धेला सामाजिकतेची जोड देत वर्षभर राबविलेल्या उपक्रमांमुळे १६ वर्षात उत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक पटलावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वेंकिग उद्योग समूहाचे बालाजी राव व उद्योजक गणेश भिंताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील टिंगरे, प्रकाश देवळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, काका हलवाईचे संचालक युवराज गाडवे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश येनपुरे, अ‍ॅड.गायत्री खडके, माजी महापौर प्रशांत जगताप आदी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. 

म्हसोबा उत्सव धार्मिक विधी गुरुवार, दिनांक ५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अभिनेता गिरीष परदेशी व कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे खजिनदार राजेंद्र बलकवडे यांच्या हस्ते श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन होणार आहे. यावेळी मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात येईल. गुरुवारी दुपारी १२ वाजता शालनअक्का उत्तमराव भिंताडे व स्मिता गणेश भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती व महानैवेद्य पार पडेल. 

शुक्रवार, दिनांक ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता महापौर मुरलीधर मोहोळ, स्वरदा बापट व धर्मादाय आयुक्तालयातील इन्स्पेक्टर रागिणी खडके यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम होणार आहे. शनिवार, दिनांक ७ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणारे पोलीस अधिकारी, मनपा कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कारागृह विभागाचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव व आमदार मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. 
उत्सवाचा समारोप रविवार, दिनांक ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७  वाजता दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे. यावेळी प.पू.कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading