ड्रीम ११ ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्स म्हणजे ‘कौशल्याचा खेळ’; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने ३० जुलै २०२१ रोजी काढलेल्या आदेशानुसार ड्रीम ११ चा ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्सचा साचा म्हणजे ‘कौशल्याचा खेळ’ नसून जुगार आणि सट्टेबाजी असल्याचा आरोप करत त्याबाबत केलेली स्पेशल लिव्ह पिटीशन फेटाळून लावली. आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचे पुष्टीकरण केले आणि आदरणीय राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे समर्थन करताना ड्रीम ११ चा ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्सचा साचा म्हणजे ‘कौशल्याचा खेळ’ असल्याच्या निर्णयाला पुष्टी दिली.
अशाप्रकारे ड्रीम ११ च्या ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्सला आता भारतीय राज्यघटनेचे संरक्षण मिळालेले आहे. याबद्दल दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेला फेटाळून लावताना मा. राजस्थान उच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणाउच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेला सट्टेबाजीचा मुद्दा निकाली काढणारा आदेश कायम ठेवला. विशेष बाब म्हणजे आणखी एका जनहित याचिकेवर मा. राजस्थान उच्च न्यायालयाने याच प्रकारची भूमिका घेतली आहे. यावेळी मा. न्यायालयाने फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे जारी करण्यात आलेल्या आदर्श कार्यपद्धतीच्या नियमावली व सुचनांमधील काही विशिष्ट मुद्द्यांचे विवेचन देखील केले.
वास्तवातील सामना आणि ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्स स्पर्धा यांच्यातील साम्यस्थळे; वास्तवातील सामना आणि ओएफएस स्पर्धा यांच्या संघनिवडीतील साधर्म्य; वास्तवातील सामन्याइतक्याच वेळेत ओएफएस खेळली जाणे; सामना सुरु करण्यासाठीच्या वेळेत बदल करण्याची परवानगी नसणे अशा काही मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश होता. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ड्रीम ११ तर्फे चालवल्या जाणाऱ्या ओएफएस कार्यपद्धतीला पुन्हा एकदा बळकटी प्राप्त झाली आहे.
ड्रीम ११ चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन म्हणाले की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने ड्रीम ११ फँटसी स्पोर्ट्सच्या प्रकारचा कायदेशीरपणा राखला याचा आम्हांला आनंद होत आहे. फँटसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रीडा विश्वाशी असलेल्या आमच्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. यामुळे क्रीडा प्रेमींना त्यांना आवडत असलेल्या खेळाच्या आणखी जवळ आणता येईल आणि भारतात आणखी मोठी क्रीडासंस्कृती रुजायला मदत होईल.”
