Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

छान आवाज ऐकला तो रसिकांच्या टाळ्यांचाच..! डॉ. सलील कुलकर्णी यांच्या भावना

पुणे : पेटी घेऊन गाता-गाता 25 वर्षे कशी गेली हे कळलेच नाही. या सांगितिक वाटचालीत दिग्गज कलाकार, संगीतकारांचे आशीर्वाद, कौतुकाची थाप अन् रसिकांची दाद मिळाली. आयुष्यातील सगळ्यात छान आवाज ऐकला तो रसिकांच्या टाळ्यांचा. भविष्यातही हा आवाज ऐकायला मिळत रहावा, खुल्या हवेत भेटता यावे, हे सांगतानाच ‘माझे जगणे होते गाणे’ अशा सुरावटीने प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

निमित्त होते ते अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याचे. डॉ. कुलकर्णी यांच्या सांगितिक वाटचालीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते पुणेरी पगडी, उपरणे व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. कुलकर्णी बोलत होते. नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, उपाध्यक्ष प्रवीण बर्वे, सत्यजित धांडेकर, दीपक पवार व्यासपीठावर होते.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, डॉक्टरी करावी की संगीत क्षेत्रात यावे हा सुरुवातीच्या काळात प्रश्न असताना संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या सल्ल्याने सांगितिक क्षेत्रात पदार्पण केले. कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक देशात जाता आले. देश-विदेशातील रसिकांनी भरभरून दाद दिली. अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण केली असे वाचले होते. आपल्या विषयी असे कुणीतरी बोलेल असे वाटलेच नाही. पण पेटी घेऊन गाता-गात 25 वर्षे सुंदर गेली. बा. भ. बोरकर, सुधीर मोघे अशा दिग्गजांच्या गाण्यांवर अनेक कार्यक्रम केले. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाला आजच 18 वर्षे पूर्ण होत आहेत. या वाटचालीत संदीप खरे, आदित्य आठले आणि इतर कलाकारांची मोलाची साथ मिळाली.

प्रशांत दामले म्हणाले, सामान्य माणसालाही गुणगुणता येतील अशा गाण्यांची निर्मिती सलील यांनी केली आहे. आवाजाचे महत्त्व त्यांची कारकिर्द पाहिल्यानंतर लक्षात येते. परफॉर्मिंग आर्टच्या क्षेत्रात सातत्य राखणे ही फार अवघड गोष्ट आहे, पण सलील यांनी ती लिलया पेलली आहे. त्याचबरोबर आयुष्यातील गंभीर गोष्टी हसतखेळत रसिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा आहे. एकट्याने कला सादर करताना त्यातील चुका समजणे आणि त्या सुधारणे याची समज बुद्धिमान कलाकाराकडेच असते. ते ही गुण सलील यांच्यात दिसतात.

Leave a Reply