Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुनर्वसन, अतिक्रमण यांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेऊन आराखडा तयार केला जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली : अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, नद्याजोड उपक्रम या बाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेऊनच विकासकामे केली जातील. पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेऊन आराखडा तयार केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्विन पूल, हरभट रोड येथे भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 2019 चा महापूर, कोरोना आणि आता 2021 चा महापूर या सर्व पार्श्वभूमीवर पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. वारंवार येणारी संकटे पाहता आतापर्यंत विकास करताना काही उणीवा राहिल्या असल्यास कठोरतेने नियमांची अंमलबजावणी करा, ब्ल्यू लाईन, रेड लाईन अशा रेषा किती दिवस काढायच्या ? त्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणीही होणे आवश्यक आहे. ज्या वस्त्यांमध्ये पाणी वाढत आहे. त्याचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. पुराचे व्यवस्थापन सुनियोजितपणे करणे आवश्यक आहे. सांगली शहरातील शेरी नाल्याचे पाणी अन्यत्र वळविता येईल का ? यासाठीही विचार व्हावा.

पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेऊन आराखडा तयार केला जाईल. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, एनडीआरएफचे निकष जुने झाले आहेत. ते बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती केली आहे. व्यापाऱ्यांनी विमा काढला असला तरी विमा कंपन्यांकडून त्यांचा पंचनामा कधी होणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरुन तात्काळ 50 टक्के रक्कम द्यावी. बँकांचे व्याज दर कमी करावेत. याबाबत निर्देश देण्याचीही केंद्र सरकारला विनंती केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार धैयशिल माने,  आमदार सर्वश्री मोहन कदम, अरुण लाड, डॉ. सुरेश खाडे, अनिल बाबर, धनंजय गाडगीळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading