Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

कोरोनामुक्त गावासाठी सरपंच, ग्रामसेवकांनी नियमांची अंमलबजावणी करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी शासनाने कोरोनामुक्तीसाठी जे नियम आणि योजना आखल्या आहेत, त्याची अंमलबजावणी केली, तर गाव कोरोनामुक्त होऊन तुम्ही लोकं खरे कोरोनामुक्तीचे दूत व्हाल, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुणे ग्रामीण कोरोना आढावा घेण्यासाठी व कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समित्यांचे सभापती, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शासनाच्या योजना राबवितांना गावक-यांना सहभागी करुन घेतले. तीच यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे कारण असेल तरच बाहेर पडावे, अशी सवय लावून घेतली पाहिजे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, वेळोवेळी मास्क व्यवस्थित धूवून वापरले पाहिजे. जेव्हा गावेच्या गावे बाधित होऊ लागतात तेव्हा गावपातळीवर गृह विलगीकरणाच्या व्यवस्था फसतात. त्यामुळे दुस-या लाटेमध्ये गृह विलगीकरण कमी करा असा निर्णय घेण्यात आला, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या त्यासाठी कोविड केअर सेंटर सुरु केले. परंतु लोक कोविड सेंटरमध्ये जायला घाबरत होते. परंतु गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवकांनी लोकांचा विश्वास जिंकला. सकारात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. कोविडमुक्ततेचे निकष शासनाने जाहीर केलेले आहेत. जिल्हा परिषदेने याबाबतीत चांगले काम केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, शासनाने जाहीर केलेल्या योजना राबविण्यासाठी ते घटकच दुर्बल आहेत. त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत. असंघटीत कामगार म्हणजे बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगार यांच्यासाठी शासनाने कोरोनाकाळात अर्थसहाय जाहीर केले आहे. परंतु कामगारांची नोंदणी नसल्याने ही मदत संबंधितांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सर्व बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या http://www.mahabocw.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. गो-हे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाच्या अनुषंगाने सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading