fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

परभणी – ५५ हजाराची लाच घेताना सोनपेठच्या तहसिलदारला रंगेहाथ पकडले

परभणी : वाळूसाठ्यावर टिप्पर चालविण्यासाठी ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या सोनपेठ तहसिलदारांसह संगणक चालकावर परभणी, हिंगोली लाचलुचपत विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. आज २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांना ताब्यात घेण्यात आले. सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तालुक्यातील पोहंडुळ येथे वाळूसाठा केलेला आहे. या साठ्यावर टिप्पर चालविण्यासाठी तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी शुक्रवार ३० जुलै रोजी तक्रारदाराकडे ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर संबंधीताने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक निलेश सुरडकर, परभणी येथील उपअधिक्षक भरत हुंबे आणि त्यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी तहसिल कार्यालय परिसरात सापळा लावला.

तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांना संगणक चालक सय्यद इसाक सय्यद रहीम यांच्या मार्फत तक्रारदाराकडून लाच घेताना पकडण्यात आले. सदर तहसिलदारा विषयी तालुक्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात नाराजी होती. वाळू वाहतूकदारांना अवैध मार्गाने रक्कम मागितल्या जात होती. सोमवारी लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईनंतर या प्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनातील एका मोठ्या अधिकार्‍यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता महसूल विभागातील तहसिलदार लाच घेताना अडकला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading