निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा -चंद्रकांत पाटील
पुणे: लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असे संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल असे जाहीर केले.
चंद्रकांत पाटील सोमवारी पुण्यात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य नेणारे वाहन रवाना केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, सरकार किती दिवस व्यापार बंद ठेवणार आणि जनजीवनही बंद ठेवणार आहे ? दारुची दुकाने चालू ठेवायची आणि कपड्यांच्या आणि किराणा दुकानांवर निर्बंध लादायचे याला अर्थ नाही. आर्थिक व्यवहार बंद राहिले तर लोकांना जगणे अवघड होईल. दुकाने पुन्हा एकदा नियमितपणे सुरू झाली पाहिजेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे. गरज पडल्यास आपण स्वतः व्यापाऱ्यांचे नेतृत्व करू.
ते म्हणाले की, पुण्यातील मेट्रोची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. केंद्र सरकारचा या प्रकल्पात सर्वात मोठा आर्थिक वाटा आहे. या प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या आणि पायाभूत काम देवेंद्र फडणवीस सरकारने केले. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रोची चाचणी घाईघाईत उरकण्यात आल्याबद्दल त्यांनी मेट्रो कंपनीचा निषेध केला. भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारने सर्व काम केले असताना आता कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न इतरांनी केला तरी लोक फसणार नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरायचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले होते पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. खोटे बोलायचे आणि वेळ मारून न्यायची अशी महाराष्ट्र विकास आघाडीची पद्धती आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, शेतकरी कर्जमाफी अशा सर्व बाबतीत आघाडी सरकारने खोटारडेपणा केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
