सातारा – कोंडावळे येथे घरांवर दरड कोसळून काही माणसे अडकल्याचे समजताच आमदार मकरंद पाटील धावले मदतीला
वाई: वाईच्या पश्चिम भागात कोंडावळे येथे घरांवर दरड कोसळून काही माणसे अडकलीत असे समजताच कालच्या गर्द काळोखात, घनघोर पावसात आमदार मकरंदआबा पाटील यांनी कोंढावळेकडे धाव घेतली.
पाऊस एवढा की काल त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक 756 मिलिमीटर तिथे कोसळत होता. विचार करा प्रलय काय असेल. रस्त्यावर लोट वाहत होते तरीही तो प्रलय आबांना थांबवू शकला नाही. जाताना जेसीबीवाले, तहसीलदार, वनविभाग अधिकारी यांना जागी पोहोचण्याच्या सूचना. वाटेत कोणी स्थानिक प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनाही पोहोचण्याच्या सूचना. त्यातूनच माझे मित्र आमले त्यांच्यासमवेत तिथे पोहोचले.
गाडी जाग्यावर पोहोचत नव्हती. आबा गाडीतून उतरले, चालू लागले. वाट तर कसली पाऊल टाकले तर चिखलातून बाहेर पडत नव्हते शिवाय किर्रर्र काळोखात आभाळ फटल्यासारखा पाऊस. त्याही परिस्थितीला हरवून आबा तिथे पोहोचले.
जेसीबी चलेना, पोकलेन बोलावला. स्वतः पुढे होऊन काळजीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या घरातील लोकांना काढले, पहाटेचे 3 वाजले होते पण या घनगोर प्रसंगात, घनदाट काळोखात आणि आकाशातून कोसळणाऱ्या धुवादार पावसात आबा पाय घट्ट रोवून उभे राहिले. कपडेच काय सारं अंग चिखलाने माखले होते, या पावसाने आणि घामानेही अंग भिजलं होतं…
काय म्हणावं या धैर्याला, धाडसाला आणि जनसेवेच्या धडाडीला.. एकचं वाटलं असेल तेथील सर्वांना, आबा धावला, आज मी देव पाहिला.
ग्रेट आबा. या दुर्घटनेतील सर्वांच्या उपचाराची देखील काळजी फॉलोअप घेत आहात अजूनही काही हवं नको पाहत आहात.
तुम्हाला अशा कामी अधिकाधिक शक्ती मिळो हीच माझ्या पांडुरंग चरणी प्रार्थना.
