ताम्हिणी परिसरात 24 तासात तब्बल 468 मिलीमीटर पावसाची नोंद

पुणे: पंधरा दिवसांची दडी मारल्यानंतर पुन्हा सक्रीय झालेला मान्सून काही भागात जोरदार कोसळत असल्याचं चित्र आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून ताम्हिणी परिसरात 24 तासात तब्बल 468 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये468 पाऊस होत असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी होतं. मात्र हा पाऊस पाणलोट क्षेत्रातच पडला असल्यामुळे धरणात पाण्याची मोठी वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात धरण परिसरात 468 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे ऐतिहासिक 73 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी जमा झालं आहे. धरणाच्या जलाशयाच्या पातळीत तब्बल 7 फुटांनी वाढ झाली आहे. 24 तासांत झालेली ही ऐतिहासिक वाढ आहे. गायब झालेल्या पावसानं हजेरी लावल्यानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात केली. त्याचा परिणाम धरणाच्या पाणीपातळीवर झाला आहे.
धरणाचा गुरुवारचा साठा २२० दलघमी असून टक्केवारी ३८.६०% आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असून अचानक पावसाचे प्रमाण वाढलं तरी काळजी करण्याची गरज नसल्याचं धरण प्रशासनानं म्हटलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: