fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाड – तळीये गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

महाड – रायगड जिल्ह्यातील महाड पासून 20 किमी अंतरावर असलेल्या तळीये गावात दरड घरांवर कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. या ढिगाऱ्याखाली आणखी ३० जण अडकल्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. गुरूवारी सायंकाळीच ही घटना ४ वाजताच्या सुमारास घडलेली आहे. पण महाडला जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने कालपासून मदतकार्य पोहचवता आले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच बचावकार्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. पण सायंकाळी हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवण्यात अडथळे आल्याने गुरूवारी मदत पोहचवता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी एनडीआरएफची एक टीम पोहचली असून त्याठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारीही पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतून एनडीआरएफच्या एका टीमला एअरलिफ्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

गुरूवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाल्यावर दृश्यमानता अतिशय कमी झाली होती. त्यामुळे याठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवणे कठीण झाले होते. पण आज सकाळीच एनडीआरफच्या टीमला याठिकाणी एअरलिफ्ट करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या टीमला लॅण्डिंगसाठीची जागा शोधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपुर्ण घटनेत मदतकार्य पोहचवण्यात प्रशासनाचे संपुर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुंबईकर येऊन ठाण्यातून येऊन लोक मदत करू शकतात, पण प्रशासन पोहचू शकत नाही असाही आरोप त्यांनी केला.

तळीये गावामध्ये रात्री दरड कोसळल्याची घटना समोर आली होती. या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र सर्व पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफ आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण मातीच्या ढिगार्‍याखाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading