शब्दब्रह्म आणि नादब्रह्मचा प्रा.जोशी यांच्या वक्तृत्वात संयोग – डॉ. राजा दीक्षित
पुणे : वक्तृत्वाचा महामेरु प्रा.शिवाजीराव भोसले यांचा परिसस्पर्श प्रा.मिलिंद जोशी यांना लाभला. प्रा. मिलिंद जोशी हे वक्तृत्वाच्या भोसले घराण्याचे शिष्य असले तरी त्यांनी त्यांची वेगळी शैली विकसीत केली आणि रुजवली. त्यांच्या वक्तृत्वात शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यांचा संयोग झाला अाहे, असे मत महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
साहित्यीक प्रा.मिलींद जोशी यांच्या व्य़ाख्यान प्रवासाच्या राैप्यमहोत्सवानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठान आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ.दीक्षित बोलत होते. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस उपस्थित होते.
डॉ.राजा दीक्षित म्हणाले, गुरुला देखील त्याचे शिष्य हे एकाच छाप्यातील शिक्के अशा स्वरुपात नको असतात. शिष्यांनी त्यांची शैली विकसीत करावी असे गुरुला अपेक्षित असते. त्याअर्थाने जोशी गुरुंच्या सगळ्या कसोट्यांवर उतरले. ते स्थापत्य अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असले तरी त्यांनी साहित्याची कास धरत शाब्दिक आणि वाचिक सकस बांधकाम केले आहे. त्यांच्यात शब्दब्रह्म आणि नादब्रह्म याचा संयोग झालेला आहे. ते त्यांच्या व्याख्यानां दरम्यान त्यांच्या सोबत श्रोत्यांना देखील वैखरीच्या या प्रवासात सामावून घेतात, सहप्रवासी करुन घेतात हे त्यांच्या वक्तृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, प्रा.जोशी यांनी त्यांच्या वक्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी वक्तृत्वाची वेगळी शैली विकसीत केलेली असली तरी ते शैलीच्या आहारी गेलेले वक्ते नाहीत. नाहीतर अनेक वक्ते शैलीच्या आहारी गेल्यामुळे बोलण्यात ते गुंगवतात, पंरतू व्याख्याना नंतर ते नक्की काय बोलले हा प्रश्न पडतो. मिलिंद जोशीच्या वक्तृत्वात आशय आणि शैलीचा संगम आहे.
प्रा.जोशी म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले भेटले नसते तर मी वक्ता झालो नसतो. वक्तृत्व ही शब्दांची आतषबाजी नाही, ती जीवनाची उपासना आहे. उत्तम तयारी आणि उस्फूर्तता यातूनच देखणे वक्तृत्वशिल्प आकाराला येते. वक्तृत्व हा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा अनेक प्रक्रियांचा संयुक्त खेळ आहे. गेली पंचवीस वर्षे व्याख्यानाच्या निमित्ताने भ्रमंती करताना जे समाज आणि संस्कृती दर्शन घडले त्यामुळे मी समृध्द झालो.
