वारीच्या परंपरेमुळे महाराष्ट्रात टिकली आपली संस्कृती शाहीर हेमंतराजे मावळे यांचे प्रतिपादन

पुणे : कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील खूप लोक पुढे आले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्या मदत करणा-या लोकांमध्ये देखील पांडुरंग आहे. आपल्या संस्कारांचा वारसा ते पुढे नेत आहेत. वारी सारखी परंपरा महाराष्ट्रात आहे म्हणून आपली संस्कृती टिकून आहे, असे मत शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्यावतीने वर्षभर पांडुरंगांची सेवा करणा-या वारकरी व टाळक-यांना सुमारे ४०० किलो धान्यरुपी प्रसाद किट देऊन सन्मानित करण्यात आले. कसबा पेठ येथील नामदेव शिंपी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रख्यात कीर्तनकार प्रा.संगीता मावळे, समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठचे अध्यक्ष रमेश मेहेर, नामदेव समाजोन्नती परिषद पुणेचे अध्यक्ष संदीप लचके, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

हेमंत मावळे म्हणाले, मनी पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेवून आळंदी, देहू ते पंढरपूरला निघालेल्या वारक-यांची सेवा ही सर्वात जास्त पुण्यात केली जाते. या पांडुरंगाच्या भक्तांची सेवा करण्याचे पुण्य पुणेकरांना मिळते. पंढरीच्या वारीने पुणे शहराला काय दिले तर भक्तीभावाबरोबर सेवाभावाची शिकवण दिले आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, महाराष्ट्राला लाभलेल्या संतांचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी आणि संतांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न केले जातात. कॉलेजमध्ये विविध डेज् तरुण साजरे करतात, तसे मराठी महिन्यातील सण देखील साजरा करावेत. मराठी सणांचे महत्व त्यांना समजावे म्हणून संस्थेच्यावतीने सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. धान्याचे कीट देऊन पांडुरंगाच्या भक्तांची सेवा करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे ही त्यांनी सांगितले. अमृत सुकाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: