भारताला २०२७ पर्यंत १०० टक्के साक्षर करण्याच्या दृष्टीने सरकार सोबतच रोटरीही प्रयत्नशील – शेखर मेहता

पुणे: भारतातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेण्यासाठी सरकार सोबत आता रोटरी इंटरनॅशनल देखील पुढील काही वर्षांत प्रयत्नशील असणार आहे. आज भारतातील ७४% प्रौढ जनता ही साक्षर असून उर्वरित प्रौढ नागरीकांना साक्षर करणे हा यातील एक महत्त्वाचा भाग असेल. त्याद्वारे देशातील ९५- १०० टक्के जनता साक्षर करण्यासाठी आम्ही सरकारच्या खांद्याला खांदा लावत काम करू,असे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष शेखर मेहता यांनी केले.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या प्रांतपालपदी पंकज शाह यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा इन्स्टॉलेशन समारंभ मेहता यांच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मेहता बोलत होते. डिस्ट्रीक्ट ३१३१ चे प्रांतपाल पंकज शाह या वेळी उपस्थित होते.

रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी शेखर मेहता यांचीही १ जुलै, २०२१ रोजी नियुक्ती झाली असून रोटरी इंटरनॅशनलच्या गेल्या ११६ वर्षांच्या इतिहासात केवळ ४ वेळाच भारतीय व्यक्तींना हा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मेहता यांची जागतिक अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

आपल्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जागतिक स्तरावर महिला सबलीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली. मेहता पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाच्या यशानंतर आता ‘साक्षर भारत’ या अभियानावर आम्ही  विशेष भर देणार आहोत. यासाठी रोटरी इंटरनॅशनलच्या देशपातळीवर सुरू असलेल्या टिच (T-E-A-C-H) या उपक्रमा अंतर्गत साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न होईल.

पोलिओ लसीकरणावेळी रोटरीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमाच्या अनुभवावरून जेव्हा गरज पडेल तेव्हा सरकारच्या मदतीने कोरोना लसीकरणासंदर्भातील जनजागृतीसाठी  रोटरी निश्चितच काम करेल, असे मेहता यांनी नमूद केले.

मेहता यांच्या नेतृत्वाखाली ‘सेव्हिंग लिटील हार्ट्स’ या उपक्रमा अंतर्गत दक्षिण आशियातील जन्मजात ह्दयदोष असणा-या आर्थिक दुर्बल घटकातील अडीच हजार मुलांच्या हदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २००४ साली आलेल्या त्सुनामीमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले होते. याशिवाय नजीकच्या भविष्यात पाणी संवर्धन, वृक्ष लागवड आदी कामे देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोटरीच्या माध्यमातून डिस्ट्रीक्ट ३१३१ अंतर्गत येणा-या पुणे आणि रायगड जिल्हात रोटरीच्या टिच (T-E-A-C-H) या साक्षरता उपक्रमाबरोबरच ग्रामीण व शहरी भागातील गरजेप्रमाणे काम करण्याचा मानस पंकज शाह यांनी बोलून दाखविला.

Leave a Reply

%d bloggers like this: