Mumbai Rain – चेंबूर येथे दरड कोसळून 15 तर विक्रोळीत 8 घरे कोसळून तिघांचा मृत्यू
मुंबई : मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने मोठी पडझड झाली आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
चेंबूर येथील भारत नगरमध्ये दरड कोसळली. यामुळे घराची भिंत पडली. मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
तसेच विक्रोळी येथील सुर्यनगर येथे आज पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाने 7 ते 8 घरे कोसळली. विक्रोळी येथे झालेल्या घरांच्या पडझडीत तिघांचा मृत्यू झाला. रामनाथ तिवारी (45), अनिकेत रामनाथ तिवारी (23), कविता रामनाथ तिवारी (42) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान भांडुप येथही एक संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे.
शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध रेल्वे स्थानकात पाणी भरले. यामुळे रविवार पहाटेपासून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मध्य रेल्वेच्या दादर, परेल, सायन, कुर्ला, भांडुप स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतूक बंद झाली.
प्रवासाच्या सोयीसाठी ठाणे ते कल्याण लोकल धावत आहे. हार्बर मार्गवर वडाळा, चुनाभट्टी, टिळक नगर, कुर्ला स्थानकात रेल्वे रुळावर पाणी आल्याने सीएसएमटी ते वाशी, गोरेगाव लोकल बंद आहे. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मधल्या स्थानकात अडकून पडल्या. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. परिमाणी प्रवासाचे हाल झाले.
