चित्रीकरणासाठी ‘या’ अटी पाळाव्या लागणार – मुख्यमंत्री
- कलाकार व तंत्रज्ञानची कोरोना तपासणी आवश्यक
- संपूर्ण टीमचे लसीकरनाचे दोन्हीही डोस पूर्ण असावेत
- चित्रीकरणाची वेळ व ठिकाणांची पोलिसांकडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक
मुंबई : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण करोना विषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे,यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रीकरणासाठी सहभागी कलाकार व तंत्रज्ञ यांचे दोन्ही डोस पूर्ण असणे गराजे आहे. तसेच टीम मधील सर्वांची करोना चाचणी करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
चित्रपट निर्मात्यांच्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. यावेळी प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा, सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव, आदेश बांदेकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी सहभागी झाले होते.
गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत. परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे, सायंकाळी 4 नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे , अशी भूमिका प्रोड्युसर गिल्डच्या वतीने यावेळी मांडण्यात आली.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे.
मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
