fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

ITI च्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग

मुंबई : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त काल आयोजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, सिमेन्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मनमोहनसिंग कोरंगा, अनिस मोहंमद, टाटा स्ट्राईव्हचे अभिषेक धोत्रे उपस्थित होते.

राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड व ठाणे या १० जिल्ह्यातील १२६ शासकीय आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग तर आयटीआयचा अंतिम निकाल घोषीत झाल्यानंतर एक वर्षासाठी ॲप्रेंटीशीपची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

आयटीआयमधील पायाभूत सुविधा व प्रशिक्षणाचा विकास करण्यासाठी विविध उद्योग स्वत:हून पुढाकार घेत आहेत. यासाठी आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

सीएसआर फंडामधून १ कोटी ८० लाख रुपये निधीतून औंध (जि. पुणे) येथील आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत वेल्डींग वर्कशॉप उभारण्यात येणार आहे. यासाठी थायसेनकृप इंडस्ट्रीजचे मुख्य वित्त अधिकारी पुलकीत गोयल आणि सुनिल सगणे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading