स्वच्छ- सुंदर इंद्रायणीनगरसाठी शिवराज लांडगे यांचा पुढाकार!

पिंपरी : स्वच्छ- सुदर इंद्रायणीनगर प्रभागासाठी भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील मोकळ्या जागा, उद्यान आणि मैदानांची तात्काळ स्वच्छता करावी, तसेच सुशोभिकरण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान व भूमि जिंदगी विभागाकडे करण्यात आली आहे.


याबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे आणि भूमि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले आहे की, इंद्रायणीनगर येथील पेठ क्र .१ येथे तसेच मोकळी जागा क्र. ३ येथील मैदानाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी गवत व झाडेझुडपे वाढली असून पदपथ मोडकळीस आला आहे. जागेत गवताबरोबरच जंगली झाडे वाढल्याने डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच पावसाचे वातावरण असल्याने जमीन ओलसर राहत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. 

भोसरीतील इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक दोनमध्ये एकूण ७० इमारती असून, सुमारे साडेचार हजार नागरिक येथे राहतात. पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने येथील विकास आराखड्यात प्रत्येक चार इमारतींमध्ये एक मोकळी जागा सार्वजनिक सुविधेसाठी सोडली होती. या परिसरात एकूण अकरा मोकळ्या जागा आहेत. त्यापैकी दोन जागांचे सुशोभीकरण महापालिकेद्वारे केले आहे. मात्र, उर्वरित नऊ मोकळ्या जागेचे सुशोभीकरण रखडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. मोकळी जागा क्रमांक सातमध्ये ओपन जीम आहे. तर क्रमांक दोनमध्ये मुलांसाठी खेळणी बसविली आहेत. मात्र , या भागातही गवत वाढल्याने व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही वाढलेल्या गवताचा त्रास होत आहे. याबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवराज लांडगे यांनी केली आहे.

गवताच्या मध्यभागी साचणाऱ्या पाण्यात डेंगीचे डास वाढण्याची शक्यता आहे. गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य वाढले असून नागरिकांसाठी धोकादायक आहे. परिसरात डास व रोगजंतूंच्या संख्येत वाढ झाली असून पाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच, या परिस्थितीमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. मोकळ्या जागांची माहिती घेऊन कार्यवाही करावी, स्थापत्य उद्यान विभागाच्या अखत्यारित येत असेल तर त्यांचे विकसन करावे, इतर नियोजित जागांची रखडलेली सुशोभीकरणाची कामे तात्काळ मार्गी लावावीत,  अशी मागणीही शिवराज लांडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: