राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे कार्य अभिमानास्पद – जनरल नरवणे

पुणे: “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.


महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.
या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”
राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: