Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

डॉ. यशवंत पाटणे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर 

– चतुरंग प्रतिष्ठानचा विशेष सन्मान

पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी  प्रसिद्ध वक्ते डॉ.  यशवंत पाटणे(सातारा) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी गेली ४७, वर्षे  प्रयत्नशील राहिलेल्या मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानचा   यावर्षी विशेष  सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रतिवर्षी हे सन्मान प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंती दिनी १५जुलै रोजी समारंभपूर्वक प्रदान केले जातात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे हे नववे  वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, न्या. नरेंद्र चपळगांवकर , डॉ रामचंद्र देखणे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांचा सन्मान केला जातो.

प्रा. जोशी म्हणाले, “महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. चार दशकाहून अधिक काळ निष्ठेने डॉ. यशवंत पाटणे  यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ. पाटणे  यांच्याविषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि डॉ. पाटणे  यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे. मुंबईच्या  चतुरंग प्रतिष्ठानतर्फे अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन गेल्या ४७ वर्षांपासून केलें जाते  त्यांच्या व्यासपीठावर अनेक दिग्गज साहित्यिक, कलावंत आणि वक्ते येऊन गेले आहेत श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यात त्यांचें  मोलाचे योगदान आहे. म्हणूनच त्यांचा विशेष सन्मान करताना समितीला समाधान वाटत आहे, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading