मोदी सरकारमधील २४ मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्हे, गृहराज्यमंत्री हत्येच्या प्रकरणात आरोपी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला. या विस्तारात ४३ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. या मंत्र्यांपैकी ४३ टक्के मंत्री म्हणजेच ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून यापैकी २४ मंत्र्यांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गुन्हे दाखल असल्याचा अहवाल .ADR अर्थात Association For Democratic Reforms ने सादर केला आहे.
निवडणुकीच्या वेळी सादर करण्यात येत असलेल्या प्रतिज्ञापत्रामधून एडीआरने हा निष्कर्ष काढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांच्याविरोधातच भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वांत तरुण मंत्री आहेत. तसेच, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि ३०७) गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, एडीआरच्या अहवालात केलेल्या दाव्यानुसार, ७८ मंत्र्यांपैकी ७० मंत्री म्हणजेच ९० टक्के मंत्री हे करोडपती आहेत. या मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही सरासरी १६.२४ कोटी रुपये इतकी आहे. केंद्रातल्या एकूण ४ मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ५० कोटींहून जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.
या अहवालानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळापैकी एकूण ८२ टक्के म्हणजेच ६४ मंत्री हे सुशक्षित आहेत. यांचं शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्याशिवाय, १५ टक्के म्हणजेत १२ मंत्री ही ८वी ते १२वीदरम्यान शिक्षण घेतलेले आहेत. एकूण दोन मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे. तर १७ मंत्री पदवी, २१ मंत्री पदव्युत्तर तर ९ मंत्री डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत.
