महाराष्ट्राच्या विदित गुजराथीची बुद्धिबळ विश्वचषकासाठी निवड

पुणे : येत्या १० जुलै पासून रशियात होणा-या बुद्धीबळ विश्वचषक २०२१ या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा ग्रँड मास्टर व ओएनजीसी कडून खेळणा-या विदित गुजराथी याची निवड झाली आहे. विदितच्या सध्याच्या मानांकनावरून ही निवड करण्यात आली असून भारतीय संघातील पी हरीकृष्ण, पी, इनायन, अरविंद चितांबरम, बी अधिबन, डी. गुकेश, निहाल सरीन आणि आर प्रग्गानंदा यांबरोबर तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एन श्रीनाथ यांची या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विदित याला लक्ष्य फाउंडेशन आणि भारत फोर्ज यांचे सहकार्य लाभले आहे,

याबरोबरच अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाच्या (एआयसीएफ ) वतीने महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कडून खेळणारे महाराष्ट्राचे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. हरिका द्रोणावली, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली आणि पद्मिनी राऊत यांचा महिला संघात समावेश असणार आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या वतीने स्पर्धेत सहभागी होणा-या महाराष्ट्राच्या विदित गुजराथी आणि अभिजित कुंटे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

सदर बुद्धीबळ विश्व चषक स्पर्धा रशियामधील सोची या ठिकाणी येत्या १० जुलै ते ६ ऑगस्ट, २०२१ दरम्यान पार पडणार असून यामध्ये तब्बल १०० देश सहभागी होणार आहेत. मागील दोन वर्षांमध्ये  प्रत्यक्षपणे पार पडणारी ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुरुष व महिला असे दोन्ही संघ हे पूर्ण तयारीनिशी स्पर्धेला सामोरे जात असून त्यांची तयारी पाहता त्यांकडून देशाला निश्चिंतपणे पदकांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: