मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येय्यासाठीचे पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आज सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतामंत्री नवाब मलिक, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, काळाची गरज ओळखून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयीसुविधा चालवणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने आज सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, योजनेसाठी साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचे महत्त्व लक्षात घेता उर्वरित निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. सध्याच्या युगात ज्या युवकामध्ये कौशल्य आहे तो कधीही उपाशी राहत नाही. त्यामुळे कौशल्य विकास विभागाच्या या कार्यक्रमाची बेरोजगारी निर्मूलनातही महत्त्वाची भूमिका ठरेल, असे ते म्हणाले.
