जनतेची सेवा करून काँग्रेस पक्ष संघटना बळकट करावी – रमेश बागवे
पुणे – “काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे. कोरोना संकटकाळात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची सेवा करून काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री व पक्षाचे पुणे शहराध्यक्ष रमेश दादा बागवे यांनी केले.
येरवडा येथील काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विल्सन चंदेवळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, संतोष आरडे, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण वाघमारे, युवक कॉँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष राहुल शिरसाट, बाबा नायडू, समीर शेख,हबिब मुल्ला, सुनिल काळोखे, जनार्दन कुसाळे, सुनील वांबोरे, सुनील तोरडमल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सह येरवडा “ई” परिमंडळ अन्नधान्य वितरण समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सुशीला जोसेफ यांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पुणे महापालिका शहरी गरीब योजनेच्या वैद्यकीय ओळखपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विल्सन चंदेवळ व ज्योती चंदेवळ यांनी केले होते. येरवडा व परिसरातील नागरिकांसाठी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणासह शासनाच्या सर्व योजना व आवश्यक योग्य ती मदत पुरवली जाईल, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक विल्सन चंदेवळ यांनी यावेळी दिली.
