जीवनदृष्टीमुळेच जगणे प्रकाशमान होते : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : सामान्य माणसांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते दिव्यांगांना अंतःचक्षूमुळे आणि जीवनदृष्टीमुळे दिसते. केवळ दृष्टीमुळे नव्हे तर जीवनदृष्टीमुळे जगणे प्रकाशमान होते. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे हेलन केलर यांच्या स्मरणार्थ “हेलन केलर पुरस्कार ” प्रतिवर्षी प्रतिभावान नेत्रहीन व्यक्तिस दिला जातो. यंदाच्या वर्षी “हेलन केलर पुरस्काराने ” महाराष्ट्र राज्याच्या दीव्यांग संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव उर्फ दादा आल्हाट यांना ज्येष्ठ व्याख्यात्या प्रतिभा शाहू मोडक यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आला त्यावेळी जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, विश्वस्त मैथली आडकर, शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष सागर आल्हाट,आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून छोटेखानी समारंभात हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

प्रा. जोशी म्हणाले, ‘ आयुष्यात जे मिळाले नाही त्याचीच खंत माणसांना वाटते पण जे न मागता परमेश्वराकडून मिळाले त्याविषयीही कृतज्ञ असले पाहिजे. माणसे आपल्या दुःखांना खूप सजवतात म्हणून ती मोठी वाटतात. इतरांच्या वाट्याला येणाऱ्या दुःखांशी तुलना केल्यानंतर आपले दुःख किती छोटे आहे याची जाणीव होते. प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. माणसांच्या मनात आशा-निराशेचा खेळ अखंड सुरु असतो. आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी आणि कर्मेंद्रिये कार्य करीत असतात. म्हणून मनात नकारात्मक विचारांना स्थान देता कामा नये. कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटाने धावत सुटलेल्या माणसांना जीवनाविषयी अधिक अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीत कशाला प्राधान्य द्यायचे याचा विचार माणसांना करावा लागणार आहे. निराशेचे मळभ केवळ सकारात्मक विचारच दूर करू शकतात. म्हणूनच मनात सतत आशादायक विचारांची पेरणी करायला हवी.

Leave a Reply

%d bloggers like this: